Saturday 26 January 2019

Adhunik Jivan shailiche dushparinam



                      आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम
                  डॉ आनंद  मोरे,  प्रोफेसर/ विभाग प्रमुख ,  
                 भारती विद्यापीठ  कॉलेज ऑफ  आयुर्वेद  पुणे  ४३.
                   मोबाईल  नंबर : ९४२२०२५७३२    ____________________________________________________________
पूर्वी उत्तम आरोग्य हि मोठी धनसंपदा मानली जात असे .परंतु आजकाल कुणालाही आपल्या शरीराकडे    लक्ष द्यायला  पुरेसा वेळा नाही .
जागतिकीकरणामुळे सर्व क्षेत्रात स्पर्धा सुरु झाली आहे. व या स्पर्धे मध्ये टिकून राहण्यासाठी माणसाने  गतिमान जीवन शैलीचा अंगीकार केला आहे. त्या साठी दिवस रात्र, तहान भूक,  विसरून वेगवेगळ्या तणावाखाली  काम  करत आहे , परंतु या सगळ्या आहार विहारातील बदलांमुळे  व विविध तणावांमुळे त्याला अल्पवयातच  वेग वेगळे विकार जडू लागले आहेत .
आपण वेगवेगळ्या बातम्या मध्ये पाहतो कि २५ वर्षाच्या तरुणाला हृदय विकाराचा झटका  किंवा कामाचा ताण असह्य झाल्यामुळे आत्महत्या केली. असे का  होऊ  लागले आहे ? याला कारण आहे आजची बदलती जीवन शैली.
आजच्या माहिती व  संगणक  तंत्रज्ञानाच्या  युगात  स्पर्धेत टिकून राहण्या साठी तंत्रज्ञ १८ ते २० तास काम करत असतात . आहाराच्या सवयीसुद्धा  बदललेल्या आहेत . फास्ट फूड , प्रक्रिया युक्त आहार ,पिझ्झा बर्गर चायनीज फूड मुळे  शरीराचे पोषण न होता वेगवेगळे विकार जडू लागले आहेत.
सततच्या कामाच्या ताण तणाव मुळे , रात्री जागरणांमुळे  व व्यायामाच्या अभावा मुळे  अल्प वयातच   उच्चरक्तदाब , मधुमेह, हृदयरोग, कंबर दुखी , मानसिक ताण , अल्सर  असे वेगवेगळे विकार पाहायला मिळतात. बदलत्या जीवन शैलीच्या प्रभावामुळे व्याधी कसा होतो हे थोडक्यात पाहू .
स्थौल्य :
स्थूलता बऱ्याच व्याधींची जननी मानली जाते. कारण त्यामुळे संधिवात, मधुमेह, उच्चरक्तदाब,   हृदयरोग , रक्तवाहिन्या टणक व अरुंद होणे इ. रोग होऊ शकतात. स्थौल्य हा विकार प्रगत देशां पेक्षा विकसनशील देशां मध्ये जास्त दिसू लागला आहे . हा विकार आर्थिक सुबत्ता व स्पर्धात्मक जीवन शैली  मुळे जास्त प्रमाणात दिसून येतो. विशेषतः उच्च कॅलरीयुक्त  आहार सेवन करणे, व्यायाम  किंवा  कष्ट  न करणे, मानसिक हेतू व अनुवंशिकता इ.गोष्टी मुळे यांचा दुष्परिणाम शरीरावर होऊन त्याचा परिणाम म्हणून स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे.
स्थूल लोकां मध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसते, तसेच त्यांचे वैवाहिक जीवन दयनीय होते, तसेच आयुष्यमान कमी होते. खूप लोक स्थौल्याला  स्वतंत्र व्याधी  मानत  नाहीत व त्याच्याकडे दुर्लक्ष करतात व त्याच्या मुळे निर्माण  झालेल्या  व्याधींची चिकित्सा करत राहतात. स्थौल्याची चिकित्सा करणे खूप कठीण असते, म्हणूनच आयुर्वेदा मध्ये  "न हि स्थौलस्य भेषज्यम " असे म्हंटले आहे .
मधुमेह:
स्थूलता व मधुमेहाचा निकटचा संबंध आहे. भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण खूप वाढलेले आहे, भारताला मधुमेहाची राजधानी मानली जाते, मधुमेह हा संतुलित कार्बोदक आहार, बैठे काम करणे, श्रम न करणे,  इन्सुलिनचा अभाव व अतिरिक्त मानसिक ताण यामुळे दिसून येतो. याचे  प्रमाण तरुण लोकांमध्ये अधिक दिसूं लागले  आहे. कारण तरुणांमध्ये कामाची स्पर्धा ,आर्थिक अस्थिरता, कामाचा ताण अधिक दिसूंन येतो विशेषतः आय टी   क्षेत्रा मधील व्यक्तीं  मध्ये   याचे प्रमाण अधिक दिसून येते .
मधुमेह हा अनेक रोगांना निमंत्रण देतो उदा.  स्थौल्य, हृदयरोग ,उच्च रक्तदाब .
हृदय विकार:
हृदय विकार हा स्थूल तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्ती मध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो .
हृदयरोगाची सद्य काळातील कारणे पुढील प्रमाणे दिसून येतात. अधिक शारीरिक श्रम करणे, मांसाहार   ,चरबी युक्त पदार्थांचे अधिक सेवन, सातत्याने मानसिक तणावा खाली राहणे किंवा भावनांचा प्रक्षोभ  होणे, अधिक प्रमाणात धूम्रपान करणे इ.गोष्टी मुळे यांचे प्रमाण जास्त दिसून येते. अलीकडे पाश्चिमात्यांकरणा मुळे नौकरीची स्पर्धा, अधिक श्रम करणे व तरुणांमध्ये धूम्रपान व  मद्यपान  यांचे प्रमाण वाढले आहे, व त्याची  परिणती हृदयरोगामध्ये होत आहे .
मानसिक ताण :
यांचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. आयटी क्षेत्रामध्ये कामाचा ताण प्रचंड प्रमाणात असतो व त्यामुळे नौकरी टिकवण्याची  स्पर्धा, आर्थिक अस्थिरता व असंतुष्ट वैवाहिक जीवना मुळे अशा व्यक्तीं  मध्ये  चिडखोरपणा वाढतो व त्यामुळे हे लोक समाजामध्ये, मित्रमंडळींमध्ये  हे  सामावून जात नाहीत व त्यांचा एकलकोंडे पणा वाढत जातो. त्यामुळे मानसिक ताण सहन न झाल्यामुळे अशा लोकां मध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे .
कंबरदुखी :
कंबरदुखी हि सामान्यतः वृद्धा अवस्थेतील आजार मानला  जातो. परंतु आजकाल याची सुरवात तरुण अवस्थेपासून  झालेली आढळून येते. याचे कारण म्हणजे नौकरी निमित्त दुचाकीवरून अधिक प्रवास करणे , किंवा कॉम्पुटर समोर एकाच  स्थिती मध्ये बराच वेळ बसून राहणे, चुकीच्या आसन पद्धतीमुळे पाठीच्या मणक्यांची झीज होऊ लागते, त्या मुळे कंबरदुखीचे प्रमाण अधिक  झाले आहे .
अल्सर:
वेळी अवेळी खाणे, तिखटतेलकट खाणे, चायनीज पदार्थ खाणे, फास्टफूड खाणे, धूम्रपान करणे, तंबाखू सेवन, व मद्यपान करणे, अतिरिक्त मानसिक ताण यामुळे आमाशया मध्ये व्रण (अल्सर )निर्माण होतो.  आजकाल तरुणपिढी मध्ये वरील कारणाचे सेवन जास्त होते, व त्यामुळे तरुणांमध्ये अल्सर होण्याची शक्यता वाढते .
निद्रानाश:
आयटी  व बीपीओ  सेंटर मध्ये रात्र पाळी मध्ये काम करावे लागते, तसेच आजची  तरुणाई नेट  कॅफे  मध्ये रात्रभर  कॉम्पुटर समोर  बसतात, रात्रीचे जागरण, पार्ट्या, तसेच पिक्चर  पाहणे , मानसिक ताण इ . कारणामुळे   निद्रानाश विकार जडू शकतो .
अशा प्रकारे या बदलत्या  जीवन  शैलीचा खूप प्रभाव जनसामान्यांवर पडला आहे ,त्यामुळे वरील विकारांचे  प्रमाण वाढले आहे,या साठी आयुर्वेदा  मध्ये वर्णन  केलेल्या   दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविधी  विशेषआयतनांचे जर पालन केले तर वर उल्लेख  केलेल्या  आजारांचे प्रमाण कमी होईल, व मनुष्य सुखी होईल.  
_____________________________________________________________________________________

No comments:

Post a Comment